
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली असून त्यावरील 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला आहे. त्या पाचही जणांना अलीबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत . बोटीवर एकूण आठ खलाशी होते. उर्वरित तीन खलाशांचा शोध सुरू आहे.
हेमंत बळीराम गावंड रा. आवरे, संदीप तुकाराम कोळी रा. करंजा, रोशन भगवान कोळी रा. करंजा, शंकर हिरा भोईर रा. आपटा, कृष्णा राम भोईर रा. आपटा असे पोहत किनारयावर आलेल्या खलांशांची नावे आहेत. नरेश राम शेलार, धीरज कोळी आणि मुकेश यशवंत पाटील हे तिघे खलाशी बेपत्ता असून ड्रोनच्या मदतीने त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई नावाची मच्छीमार बोट आज सकाळी 7 वाजता समुद्रात मासेमारी साठी निघाली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खांदेरी किल्ल्याजवळ आली असता ही बोट लाटांच्या जोरदार माऱ्याने बुडाली. बोटीवरील 5 खलाशांनी 9 तास पोहून किनारा गाठला. मांडवा सागरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.