
ॲकर-रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मुंबई-गोवा महामार्गालाही बसला आहे. नागोठणेजवळील सुकेळी खिंडीत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. पाण्याचा निचरा न होऊ शकल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. परिणामी काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली. काही चालकांनी मात्र जोखीम पत्करून पाण्यातूनच वाहने चालवली.
या स्थितीचा फटका केवळ सुकेळी खिंडीपुरता मर्यादित नसून, पेण, हमरापूर, आणि तारा येथील उड्डाण पूलांवरही निचऱ्याची व्यवस्था अपुरी ठरत आहे. त्यामुळे पूलांवर पाणी साचून अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाळा खिंड आणि आपटा फाटा परिसरातही महामार्गावर पाणी साचल्याच्या तक्रारी वाहनचालकांनी केल्या आहेत.
या गंभीर स्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.