रायगड: सायबर गुन्हेगारीच्या तपासात रायगड सायबर पोलिसांनी मोठा भांडाफोड करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ११ आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी विविध बनावट कंपन्यांच्या नावावर नागरिकांना बनवताना आढळले असून, त्यांच्या कब्जातून तब्बल दीड किलो वजनाचे ६१७५ सिमकार्ड्स, ३५ मोबाईल फोन, लॅपटॉप, स्टँप, रोकड व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई २३ मे २०२५ रोजी दाखल तक्रारीच्या अनुषंगाने सुरू करण्यात आली होती. आरोपींनी बनावट कंपन्या उघडून त्याद्वारे लोकांकडून कर्ज, ऑनलाइन नोकऱ्या, इन्व्हेस्टमेंट, स्कॉलरशिप आदींच्या आमिषाने लाखो रुपये उकळले. यात वापरलेले मोबाइल नंबर, सिमकार्ड्स, SIP LINE, आणि बनावट कागदपत्रे हे सर्व देशभरात सक्रिय असलेल्या संगठित सायबर टोळीचे पुरावे म्हणून समोर आले आहेत.
या कारवाईत ३५ मोबाईल फोन्स, ४ रबर स्टँप, १ अमेझॉन कंपनीचा टॅब, १ डेल कंपनीचा लॅपटॉप, १ सोनी कंपनीचा डीपीएन स्वीच पोर्ट, १ पी.ओ.ई. स्विच, १ बँक पासबुक, कॅनरा बँक ATM, रोख रक्कम: ६.६ लाख रुपये, ६हजार १७५ सिम कार्ड्स असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
११ अटक आरोपींमध्ये अब्दुस सलाम बारभुयान, बिलाल फैजान अहमद, नदीम महमद अस्लम अहमद, लारैब मोहम्मद रफीक खान, शादान येतात अहमद खान, मोहम्मद फैसल सैराउद्दीन खान, बलमोरी विनयकुमार राव, गंगाधर गंगाराम मूटटन, अमन संतराम प्रकाश मिश्रा, मोहसिन मियां खान आणि शम्स ताहीर खान यांचा समावेश आहे.
या टोळीचा प्रमुख आरोपी आदित्य उर्फ अभय मिश्रा उत्तर प्रदेशातील असून, तो ऑनलाईन स्कॉलरशिप व नोकरीच्या आमिषाने लोकांकडून पैसे उकळत होता. तो भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आदी देशांतील नागरिकांशी संपर्क साधून फसवणूक करत असे.
नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही अपरिचित व्यक्तीकडून आलेल्या कॉल/संदेश/ई-मेलवर विश्वास ठेवू नये. सायबर फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाईन १९३०, १९४५ किंवा १४४०७ वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांनी केले आहे.