ताम्हिणी घाटात भीषण दुर्घटना; हरवलेल्या ६ तरुणांचा मृतदेह ५०० फूट दरीतून सापडला

0
22

रायगड: ताम्हिणी घाट परिसरात मन हेलावून टाकणारी दुर्घटना उघडकीस आली आहे. पुण्याहून कोकण सफरीसाठी निघालेल्या सहा मित्रांच्या थार (MH 12 YN 8004) गाडीचा भीषण अपघात झाल्याचं तब्बल तीन दिवसांनी स्पष्ट झालं. सोमवारी रात्री प्रथम चव्हाण, पुनित शेट्टी, साहील बोटे, महादेव कोळी, ओंकार कोळी आणि शिवा माने हे सहा तरुण कोकणाच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र काही तासांतच त्यांच्याशी संपर्क तुटल्याने कुटुंबीयांनी चिंतेने पोलिसांत तक्रार नोंदवली.

सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे शोधमोहीम सुरू झाली. माणगाव पोलिसांच्या मदतीने ताम्हिणी घाट परिसरात शोध घेण्यात आला; पण खोल दरी, घनदाट जंगल आणि धोकादायक वळणांमुळे शोधकार्य अडथळ्यात आलं. अखेर ड्रोनच्या साहाय्याने गुरुवारी दरीत चुराडा झालेली थार आणि जवळच सहा तरुणांचे निश्चल देह आढळले. दृश्य पाहताच कुटुंबीय आणि मित्रांवर शोककळा पसरली.

कोंडेथर गावानंतरच्या पहिल्याच तीव्र वळणावर हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या भागातील उभे उतार, खोल दरी आणि दाट जंगलामुळे वाहन क्षणभर जरी अनियंत्रित झाले तरी थेट दरीत कोसळण्याची शक्यता अधिक असते. सहा मित्रांचा प्रवास अशा दुर्दैवी टप्प्यावर संपल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रशासनाकडून पंचनामा आणि पुढील प्रक्रिया सुरू असून संपूर्ण घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here