अलिबागमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश – लाखो रुपयांच्या नोटांसह एक जण अटकेत

0
30

अलिबाग: रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला असून, नुकतेच गोरेगाव पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह तीन जणांना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच अलिबाग शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अलिबाग पोलिसांनी भुषण विजय पतंगे (वय ३५, रा. मयेकर लाईन, अलिबाग) या व्यक्तीस ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून लाखो रुपयांच्या बनावट भारतीय नोटा आणि चलन तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी ही बाब पोलिस अधीक्षक आंचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांना कळविली. त्यांच्या सूचनेनुसार ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मयेकर वाडीत पोलिस पथकाने छापा टाकला. या कारवाईत आरोपी पतंगे याच्या घरातून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आणि नोटा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

सदर आरोपीविरुद्ध अलिबाग पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिपक मोरे हे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

बनावट चलन हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी गंभीर धोका असून, अशा नोटा व्यवहारात आल्यास खऱ्या चलनाचे मूल्य कमी होऊन महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी संशयास्पद चलन आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here