कुरूळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर नियुक्तीची मागणी

0
29
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील कुरूळ ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधिकारी श्री. रोशन चंद्रकांत भगत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून तात्काळ डॉक्टर नेमणुकीची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कुरूळ परिसरातील लोकसंख्या मोठी असून येथील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी हे उपकेंद्र महत्त्वाचे आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना अलिबाग किंवा इतर भागातील रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. यामुळे रुग्णांना वेळ, पैसा व श्रम या तिन्ही बाबींमध्ये मोठा फटका बसत आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे कठीण ठरत असून, लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, साधारणतः २५ ते ३० हजार रुपयांचा मासिक खर्च करून नागरिकांना बाहेरगावी उपचार घ्यावे लागत आहेत. हा आर्थिक भार सर्वसामान्य कुटुंबांवर अत्यंत जड ठरत असून, यावर त्वरीत तोडगा निघणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून उपकेंद्रात डॉक्टर नियुक्त करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर ग्रामस्थ व भाजप पदाधिकाऱ्यांनी सह्या करून पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करून, ही मागणी गांभीर्याने घेतली जाईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

रोशन भगत तालुका अध्यक्ष भाजपा ॲड.मनोज ओव्हाळ तालुका सरचिटणीस प्रथमेश मांजरेकर तालुका अध्यक्ष युवा मोर्चा विनय दळवी विनोद पाटील गणेश पाटील हितेश गोंधळी अदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here