पाली (वार्ताहर): पाली येथील सरसगड किल्ल्यावर शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडलेल्या अपघातात निखिल कदम (रा. सातारा, सध्या पुणे) या 28 वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली. ट्रेकिंगदरम्यान पाय घसरल्याने तो कडेला असलेल्या दरीत कोसळला.
अपघातात निखिलच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, कवटीला तडे जाऊन मेंदू बाहेर आला. तसेच खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले असून मानेलाही गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, स्थानिक आपदा मित्र, पाली पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू करताना निखिलनेही शारीरिक वेदनांनंतरही उत्तम सहकार्य दाखवले.
रात्री पावणे दहाच्या सुमारास निखिलला डोंगरावरून खाली आणण्यात आले. त्यानंतर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. रविवारी (ता. 3) सकाळी त्याला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले.
हा अपघात पुण्याहून आलेल्या एका खाजगी कंपनीच्या ट्रेकिंग गटात घडला. सरसगडावर उतरताना तिसऱ्या पायरीवरून निखिलचा पाय घसरला. संबंधित पायऱ्यांवर शेवाळ साचल्याने त्या अत्यंत निसरड्या झाल्या आहेत.
महसूल प्रशासनामार्फत तातडीने फर्स्ट एड किट उपलब्ध करून देण्यात आले. या धोकादायक अपघातामुळे ट्रेकिंग करताना योग्य ती दक्षता आणि स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.