मुरुड – कोकणातील प्रसिद्ध काशिद समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ११ किलो चरस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा अमली पदार्थ किनाऱ्यावर कसा आला, याचा तपास मुरुड पोलीस करत आहेत.
काशिद हा पर्यटकांचा लाडका समुद्रकिनारा असून, रुपेरी वाळू, निसर्गसौंदर्य आणि फेसाळणाऱ्या लाटांमुळे तो वर्षभर पर्यटकांनी फुलून असतो. मात्र, अलीकडे या पर्यटनस्थळी अमली पदार्थांची तस्करी वाढल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काशिद किनाऱ्यावर संशयास्पद प्लास्टिकची गोणी आढळून आली होती. मुरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्या गोणीत ११ किलो १४८ ग्रॅम चरस आढळून आला. या चरसची बाजारात किंमत सुमारे ५५ लाख ७४ हजार रुपये असून, पोलिसांनी पंचनामा करून साठा जप्त केला आहे. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, पोलिसांच्या वाढत्या कारवाईच्या भीतीने चरस समुद्र किनाऱ्यावर टाकून दिला असावा.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुरुड आणि अलिबाग परिसरात अमली पदार्थ तस्करी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली होती. त्यात १३ आरोपींना अटक करून १३ लाख ६१ हजार रुपयांचा चरस जप्त करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात “झिरो टॉलरन्स” धोरण राबवले जात असून, या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी मोहिमा अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. या कारवाईचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतिक्षा खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांचे पथक करत आहे.