सुपोषणात महाराष्ट्र देशात अव्वल; ‘सुपोषित ग्रामपंचायत अभियानात’ पहिला क्रमांक

0
1

मुंबई : भारत सरकारच्या ‘सुपोषित ग्रामपंचायत अभियान’ अंतर्गत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याने ही कामगिरी साध्य केली असल्याचे सांगण्यात आले. हे यश दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याला समर्पित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १००० ग्रामपंचायतींपैकी तब्बल १९२ ग्रामपंचायती महाराष्ट्रातील असून, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातील बालकांचे पोषणमान उंचावणे, कुपोषणावर प्रभावी नियंत्रण आणि माता-बाल आरोग्य सुधारण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा या यशात मोठा वाटा आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केलेल्या समर्पित कार्यामुळे हे यश शक्य झाले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बालकांना पूरक आहार, आरोग्य तपासणी व पोषण मार्गदर्शन प्रभावीपणे उपलब्ध झाले.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्राने सुपोषणाच्या क्षेत्रात देशात अव्वल स्थान मिळवत इतर राज्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here