खोपोली (दत्तात्रय शेडगे): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त खोपोली शहरात उत्साहाचे वातावरण असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. रायगड जिल्हा यांच्या पोलीस अधीक्षका श्रीमती आंचल दलाल तसेच खालापूर तालुका चे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरात भव्य रूट मार्चचे आयोजन केले.
हा रूट मार्च खोपोली शहरातील प्रमुख मार्ग तसेच शिळफाटा परिसरात काढण्यात आला. विविध संस्था, मंडळे आणि संघटनांकडून दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. मिरवणुका, ढोल-ताशांचे पथक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ऐतिहासिक देखावे यामुळे शहरात मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करता यावा, यासाठी पोलिसांनी ही दक्षता घेतली.
रूट मार्चदरम्यान पोलिस अधिकारी व कर्मचारी पूर्ण गणवेशात सज्ज होते. शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच समाजात शांततेचा संदेश जावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
पोलिस प्रशासनाने सर्व मंडळे व नागरिकांना उत्सव साजरा करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन, वाहतूक कोंडी टाळणे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवणे, असे आवाहन करण्यात आले.
शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो शौर्य, स्वाभिमान आणि संघटनशक्तीचा प्रेरणादायी दिवस आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेला रूट मार्च हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी घेतलेला महत्त्वपूर्ण पुढाकार मानला जात आहे.



