अलिबाग (प्रतिनिधी) – रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असतानाच अलिबाग तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेना (शिंदे गट) यांनी शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) मोठा धक्का दिला आहे. रामराज विभागातील शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य सुभाष वागळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शेकापचा हक्काचा बालेकिल्ला ढासळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार दळवी यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करताना, “रामराज विभागातील हा पक्षप्रवेश आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयासाठी निर्णायक ठरणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते बाळाशेठ तेलगे, कावीर जिल्हा परिषद उमेदवार व तालुकाप्रमुख आनंद गोंधळी, नियोजन समिती सदस्य तथा कावीर पंचायत समिती उमेदवार संतोष निगडे, रामराज पंचायत समिती उमेदवार तृषा भगत, जिल्हा खजिनदार सुरेश म्हात्रे, उपतालुकाप्रमुख अरविंद भगत, माजी उपतालुकाप्रमुख आप्पा पालकर, युवासेना जिल्हा समन्वयक अजय गायकर, विभागप्रमुख महेश शिंदे, युवासेना उपतालुका प्रमुख जीवन म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुभाष वागळे (माजी पंचायत समिती सदस्य), धर्मा लोभी (माजी पंचायत समिती सदस्य), अर्चना पालकर (माजी रामराज ग्रामपंचायत सदस्य), नितीन पालकर, गणेश धुमाळ (माजी उपसरपंच, रामराज), अभिषेक म्हात्रे (युवा कार्यकर्ते), गजानन दिवकर व रामचंद्र भोईर (माजी सुडकोळी ग्रामपंचायत सदस्य) यांचा समावेश आहे.
या घडामोडीमुळे अलिबाग तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत असून, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे बोलले जात आहे.



