अलिबाग (प्रतिनिधी): अलिबागमधील चेंढरे येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रस्तावित शेती कर्जमाफीबाबत बैठक पार पडली. अध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील विविध जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व अधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी सांगितले की, सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे परंतु कर्जमाफीची प्रक्रिया शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे आणि योग्य शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळावा, यासाठी एक सर्वसमावेशक धोरण तयार केले जाणार असून पुढील आठवड्यात पुण्यात सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे.
प्रहार जनशक्तीचे नेते आणि अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष
बच्चू कडू यांनी सांगितले की, जुन्या थकीत कर्जदारांना मुदतवाढ देऊन नवीन कर्ज वितरणाचे धोरण ठरवावे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा बँकांना माफीची रक्कम मिळाली पाहिजे, कर्ज माफी बरोबर शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देणे गरजेचे आहे अन्यथा शेतकऱ्यांना अडचणी येतील. कर्जमाफी प्रक्रिया सुलभ ठेवून बँका अडचणीत येणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. बँकांना कर्जमाफीची रक्कम वेळेत मिळाली तरच बँका शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देऊ शकतील अन्यथा छोट्या बँका अडचणीत येतील अशी भीती बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अडचणी, शासन धोरणातील सुधारणा आणि शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी जलदगतीने पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यात आली. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सर्वांचे स्वागत केले.



