पनवेल पोलिसांची शिताफी – अट्टल गुन्हेगाराला अटक, ओलीसांची सुटका

0
1

पनवेल: 03 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.30 वाजता पनवेल शहरातील मंगला निवास, गोडसे आळी, जुने तहसील कार्यालयासमोर भीषण घटना घडली. प्रॉपर्टीच्या वादातून सोबन बाबुलाल महतो (वय 35) या अट्टल गुन्हेगाराने घरात घुसून आपल्या नातेवाईकांना ओलीस ठेवत कोयता व कुऱ्हाडीच्या धाकावर दहशत माजवली. मात्र, पनवेल पोलिसांनी दाखवलेल्या शौर्य आणि शिताफीमुळे सर्व ओलीसांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, महतो हा 2018 च्या खुनाच्या प्रकरणातील आरोपी असून आठवडाभरापूर्वीच जामिनावर सुटला होता. घटनेची माहिती मिळताच सपोनि प्रज्ञा मुंढे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला शरण येण्याचे आवाहन केले असता त्याने पोलिसांनाच जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर वपोनि नितीन ठाकरे, पोनि (गुन्हे) शाकिर पटेल, सपोनि प्रविण फडतरे, पोउपनि अस्पतवार आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीने घरात अडकलेल्या लोकांना ठार मारण्याची धमकी देत पोलिसांवर कुऱ्हाडी व कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात पोना रविंद्र पारधी, पोना सम्राट डाकी, पोहवा माधव शेवाळे व पोशि साईनाथ मोकल जखमी झाले.
स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दरवाजा तोडून प्रवेश करताना मपोशि साधना पवार यांनी चिली स्प्रेचा वापर केला. मात्र आरोपीने आपल्या पुतणीच्या गळ्यावर कोयता ठेवून जीव घेण्याची धमकी दिली. अशा कठीण प्रसंगात पोना सम्राट डाकी व पोशि साईनाथ मोकल यांनी धाडसी झडप घालत आरोपीला अखेर ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिस अंमलदार जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीकडून कोयता व कुऱ्हाड जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 526/2025 भा. दं. सं. विविध कलमांखाली तसेच हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह आयुक्त संजय ऐनपुरे, उपायुक्त प्रशांत मोहीते व सहा. आयुक्त भाऊसाहेब ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धाडसी मोहिमेत वपोनि नितीन ठाकरे, पोनि शाकिर पटेल, सपोनि प्रज्ञा मुंढे, सपोनि प्रविण फडतरे, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा शौर्यपूर्ण सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here