अलिबागकरांचा संताप ! गावावर दरड कोसळली, वृद्धेचा मृत्यू

0
5

घटनास्थळावर नेत्यांच्या पत्नींमध्ये हातापाई, ग्रामस्थांकडून हकालपट्टी

‘सहानुभूती नको, लगेच निघून जा !’ ग्रामस्थांनी जाहीरपणे ठणकावले

अलिबाग (खास प्रतिनिधी): मुरुड तालुक्यातील मिठेखार गावावर मंगळवारी सकाळी अचानक दरड कोसळली. या दुर्घटनेत ७५ वर्षीय वृद्धा श्रीमती विठा मोतीराम गायकर यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थ शोकाकुल वातावरणात असताना, घटनास्थळी पोहोचलेल्या दोन महिला नेत्यांमध्ये राजकीय वाद उफाळून आला. यात थेट हातापाई झाली, ज्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना ‘सहानुभूती नको, लगेच निघून जा’ असे जाहीरपणे ठणकावून राजकीय प्रतिनिधींना हाकलून लावले.

मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र प्रवक्त्या चित्रलेखा पाटील या पाहणीसाठी पोहोचल्या. चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सवाल केला, “सत्ता तुमच्याकडे, प्रशासन तुमच्याकडे… मग अशा दुर्घटना का घडतात ? तत्परता कुठे होती?” या प्रश्नावर मानसी दळवी संतापल्या आणि त्यांनी थेट हात उचलला. पाहता पाहता दोघींमध्ये उघडपणे हातापाई झाली. गावात मृत्यूचा आक्रोश सुरू असताना घटनास्थळी हा ‘राजकीय तमाशा’ रंगला.

या प्रकाराने ग्रामस्थांचा संताप उसळला. ते संतप्त होऊन म्हणाले, “मृत्यूचा प्रसंग आहे आणि तुम्ही राजकारण करता ? आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही. आम्ही व प्रशासन बघून घेऊ. लगेच इथून निघा! ” असे ग्रामस्थांनी जाहीरपणे ठणकावले.

दरम्यान, चित्रलेखा पाटील यांनी तत्काळ दखल घेत शिवसेना उबाठा पक्षाच्या मुरुड तालुका संघटिका राजेश्री मिसाळ यांना ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आणि गावकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाकडून विना अटीशर्ती मान्य करून घेण्याचे ठाम आश्वासन दिले.

या घटनेने अलिबाग परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ग्रामस्थ दगडखचांतून आपले भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करत असताना राजकीय नेत्यांच्या कृतींमुळे त्यांच्या जखमांवर मीठ चोळले गेल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने दुर्घटनाग्रस्तांना तातडीने मदत पुरवण्याची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here