
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील मुख्य रस्त्यांची सध्या चिंताजनक अवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेले खड्डे नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत आहेत. अलिबाग-पेण, अलिबाग-तळेखार (साळाव मार्गे), अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरूड तसेच वावे-रेवदंडा या प्रमुख मार्गांवर प्रवास करताना वाहनचालकांना विशेषतः पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काही मार्गांवर रस्त्यांचे काम रखडले असून, काही ठिकाणी काम सुरु होऊनही पूर्णत्वास गेलेले नाही. रेवदंडा ते तळेखार मार्गाचे रुंदीकरण सुरू असून, त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत १७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र सध्या या रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
अलिबाग-मांडवा रस्त्यासाठी १८८ कोटी, तर अलिबाग-मुरूड मार्गासाठी १३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. संबंधित कामांसाठी विविध कंपन्यांना ठेके दिले गेले आहेत, पण अनेक मार्गांवर प्रत्यक्षात कामाची गती मंद आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील कुरूळ ते आरसीएफ कॉलनी आणि बेलवली खानाव ते वावे नाका अशा भागांतही रस्त्यांची स्थिती सुधारण्याची आवश्यकता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य सोशल मिडीया प्रमुख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, “नागरिकांचे रोजचे हाल लक्षात घेता रस्त्यांची तातडीने डागडुजी व्हावी,” अशी विनंती केली आहे. अन्यथा नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग निवडावा लागू शकतो, असेही त्यांनी नम्रपणे सांगितले.
स्थानिक स्तरावरूनही या प्रश्नाबाबत आवाज उठवला जात असून, निधी जाहीर झाल्यानंतरही रस्त्यांची परिस्थिती जैसेथे का आहे, याबाबत स्पष्टता अपेक्षित आहे, अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येते.